सातारा दि. 6: शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. या पीक स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
पीक स्पर्धेत एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी एकदाच 300 प्रति शेतकरी पीक प्रवेश शुल्क भरुन पीक कापणी करुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा व विभाग व राज्यपातळीवर निवड करण्यात येणार आहे. रब्बी हंगाम 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. राऊत यांनी केले आहे.
















