फलटण प्रतिनिधी :
फलटण शहरातील वाढते दारूचे गुत्ते तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते संग्राम अहिवळे यांनी केली आहे. ही मागणी 1 जानेवारी पर्यंत मान्य न झाल्यास येत्या 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दारूच्या अतिरेकामुळे शहरातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून महिला, लहान मुले व युवकांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. अवैध व अधिकृत दारू विक्रीमुळे गुन्हेगारी, घरगुती हिंसाचार व आर्थिक अडचणी वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या मागणीसंदर्भात आज फलटण शहर पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात दारूचे गुत्ते तात्काळ बंद करावेत, संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच शहरात शांतता व सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने व पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संग्राम अहिवळे यांनी दिला आहे.











