इतिहासात डोकावून पाहिले असता माँ जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांनी अपार कष्ट व दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण जगापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जगात घडणाऱ्या घडामोडींची अद्ययावत माहितीचे आकलन करीत स्त्रियांनी युवा पिढी घडवताना वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे असल्याचे मत राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांनी व्यक्त केले. ते पिंपरद (फलटण) येथे झालेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरदच्या सरपंच सौ स्वाती गणेश भगत होत्या यावेळी ग्रामविकास अधिकारी महादेव बळीप, सदस्या सौ. कल्पना उदयसिंह शिंदे, सौं. रेश्मा उमेश मोरे, आरोग्यसेविका सौ.पी. बी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना सचिन मोरे म्हणाले की, ग्रामीण भागातील स्त्रियांनी चूल व मूल यातून बाहेर पडत आता सामाजिक व राजकीय क्षेत्रात चांगले योगदान दिले आहे. स्पर्धात्मक जगात भविष्यातील पिढी घडवीत असताना जगातील घडणाऱ्या घडामोडींची आद्ययवत माहितीचे संकलन करत विविध विषयांचे वाचन गरजेचे असल्याचे निदर्शनात आणून दिले. महिलांना मिळालेल्या समान संधीच्या आधारे अनेक महिलांनी राजकीय क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. पिंपरदच्या सरपंच सौ भगत यांनी अभ्यासपूर्ण कामातून ग्रामपंचायतचा कारभार उल्लेखनीय करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सरपंच सौ. स्वाती भगत यांनी आपल्या भाषणात जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून सांगताना पिंपरद गावातील स्त्रियांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी महादेव बळीप, आरोग्य सेविका सौ. प्रतिभा बी. जाधव, सौ.अनिता नितीन नाळे, यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सौ. प्रतिभा जाधव यांनी व्यक्त केले.