फलटण प्रतिनिधी - २९ जून २०२५
फलटण शहरात शनिवार दिनांक २८ जून रोजी उत्साही वातावरणात माऊलीसह लाखो वैष्णवांचा मेळावा विसवला होता. फलटण येथील एक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळी ६ वाजता श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा सोहळा बरडकडे मार्गस्थ झाला.
पालखी सोहळा बरडकडे मार्गस्थ होताच फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे व त्यांच्या सहकारी यांनी पालखीतळाची स्वच्छतेचे काम हाती घेत केवळ तीन तासात म्हणजे नऊ वाजेपर्यंत संपूर्ण पालखीतळ स्वच्छ केला.
पालखी पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्यानंतर यावर्षी प्रथमच शहरात दुर्गंध पसरू नये म्हणून बायो ओडो फ्रेश फवारणी करण्यात आली. संपूर्ण शहरांमध्ये स्वच्छता करण्याचे काम सुरु करण्यात आले. स्वतः मुख्याधिकारी निखिल मोरे हे स्पॉट व्हिजिट करून कर्मचाऱ्यांना सूचना देत होते.
शहरातील स्वच्छतेसाठी फलटण नगर परिषदेचे ७० कर्मचारी खाजगी तत्वावरील २५ कर्मचारी तर सातारा जिल्ह्यातील कराड, महाबळेश्वर व मलकापूर या नगरपालिकांचे १०० कर्मचारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषद येथील २५ कर्मचारी व सावित्रीबाई फुले विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना याचे १५० विद्यार्थी यांनी शहरातील स्वच्छतेसाठी मेहनत घेतली. कचरा संकलनासाठी ५ ट्रॅक्टर ट्रॉली २ जेसीबी मशीन १६ घंटा गाड्या इतकी वाहने वापरण्यात आली. केवळ पालखी तळावरील कचरा संकलन हे पाच टन झाले असून शहरातील कचरा संकलन त्यापेक्षा अधिक झाले आहे.
- पालखी सोहळ्या मधील महिला वारकरी व भाविकांसाठी आवश्यक सुविधानी सुसज्ज अशा हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली होती.
- वसुंधरेच्या संवर्धनासाठी माझी वसुंधरा तर्फे भाविकांना रोपांचे वाटप करणेत येऊन पालखी सोहळ्यातून वृक्ष लागवडीचा संदेश देणेत आला.
- सिंगल युज प्लॅस्टिक चा वापर करण्यात येऊ नये म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
- कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क चा वापर करा असाही संदेश देण्यात आला.
- फलटण मुक्कामी पालखीतळावर पंचायत समिती आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या पालखीतळावरील दवाखाना आणि प्रथम उपचार केंद्रामध्ये १९९२, जर्मन टेन्ट वरती १२४०, सावता माळी मंदिर येथे १६४५ वारकरी यांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.
- फलटण नगरपालिकेच्या १३ वॉटर फिटिंग पॉईंट्स वरून साधारणत १००० वारकरी बांधवांसाठीचे साधारणता दहा हजार लिटर साठवण क्षमता असलेले टँकरने शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात आला.
- यावर्षी प्रथमच यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जर्मन हँगर या ठिकाणी १५० फिजिओथेरपी चे विद्यार्थी यांच्यामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या माध्यमातून वारकरी चरण सेवा या अंतर्गत साधारणतः ४००० वारकरी बांधवांना मसाज सुविधेचा लाभ घेता आला.