फलटण धैर्य टाईम्स :
जिल्हा परिषद प्रा. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शासन विविध योजना राबवत असताना या शाळांकडे पालकांचा ओढा कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत पालकांनी या शाळा, येथील व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षण या बाबी तपासून घेऊन आपली मुले याच शाळांमध्ये दाखल करावीत असे आवाहन निवासी नायव तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी केले.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सोमवार, दि. १६ जून रोजी वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेत इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत व त्यांना शासनाच्यावतीने पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, शूज वगैरे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना निवासी नायब तहसीलदार सोनवणे बोलत होते.
यावेळी सरपंच सौ. सुवर्णा नाळे, उपसरपंच अमृत विजयसिंह नाईक निंबाळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदकुमार नाळे, फरांदवाडी केंद्रप्रमुख राजेंद्र पवार, मुख्याध्यापक राजश्री मच्छिंद्र बोबडे, उपशिक्षक सर्वश्री दत्तात्रय मोहिते, सुलभा पाठक, महादेव जगन्नाथ शिंदे, श्रीमंत नामदेव आवारे, अरविंद विठ्ठल भोसले, दत्तात्रय रघुनाथ कोकरे, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) एस. वाय. पुंडेकर, महसूल सेवक सविता जगताप, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
दि. १८ डिसेंबर १८७२ रोजी म्हणजे सुमारे १५० वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या प्राथमिक शाळेला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा असून येथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक आणि उत्तम शेतकरी म्हणून पुढे आले आहेत. आजही या शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम असून येथील शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना पालकांनी साथ केली तर या शाळेचा नावलौकिक आणखी वाढेल असा विश्वास निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
गावातील प्रा. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण स्वतः व संपूर्ण ग्रामपंचायत सतत प्रयत्नशील असून येथील सर्व समस्यांचे निवारण आपण केले आहे. यापुढेही त्यामध्ये मागे राहणार नाही, तथापि पालकांनी आपल्या मुलांना गावातील या शाळेत दाखल करून येथील शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ. सुवर्णा नाळे यांनी केले.
प्रारंभी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र पवार यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात कार्य-क्रमाविषयी माहिती दिली. पदवीधर शिक्षक अरविंद भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.