फलटण प्रतिनिधी :
महाराष्ट्रासह देशभर नामांकित कलाकाराच्या बरोबर संगीतसाजा मध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पडणारे ड्रम पॅडचा हुकमी एक्का म्हणून सुपरिचित असणारे प्रसिद्ध ड्रम पॅड वादक ओंकार हरिदास साळुंखे ( फलटण) यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार २०२५ ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रा सह देशाच्या सांस्कृतिक रंगभूमीवर संगीतसाजा मध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पडणारे ड्रम पॅडचा हुकमी एक्का म्हणून १८ वर्षे संगीत क्षेत्रात योगदान देणारे ओंकार हरिदास साळुंखे यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बालगंधर्व परिवार पुरस्कार २०२५, दि. २५ जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
ओंकार हरिदास साळुंखे यांनी गायिका मृमयी पाठक, सुप्रसिद्ध गायक संगीतकार साजन बेंद्रे, विशाल चव्हाण, राधा खुडे, बाबा पठाण, शशिगंध गोठावले, पांडव ग्रुप मेघराज राजे भोसले, महाराष्ट्राची लोकधारा, रंजन देशपांडे, यांच्यासह बीएसएफ कडून पाकिस्तान बॉर्डर वर तब्बल एक महिना विविध ठिकाणी मुंबई येथील ऑर्केस्ट्रा सोबत काम केले आहे.
आजोबांना आपले आदर्श मानून वडील सुप्रसिद्ध ढोलकी वादक हरिदास उर्फ दादा साळुंखे यांच्या आशीर्वादाने ओंकार यांनी संगीत क्षेत्रात पाऊल टाकले. पिढ्यान पिढ्या चालत आलेली कला अंगी जोपासात गेली अठरा वर्ष ओंकार साळुंखे हे बालगंधर्व परिवारात सहभागी असून कलेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ओंकार यांच्या यशाबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.