फलटण प्रतिनिधी –
फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत रामराजे गटाची ३५ वर्षांची सत्ता संपवली. या विजयाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती विशेष ठरणार आहे. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांत फलटणच्या विकासाला लागलेला ब्रेक, रखडलेली कामे आणि जनतेच्या प्रश्नांकडे झालेली दुर्लक्ष यावर थेट बोट ठेवणार का, याकडे संपूर्ण फलटणचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालाने स्पष्ट संदेश दिला आहे की, फलटणकरांना बदल हवा होता. विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर महायुतीला मोठे यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर मंत्री गोरे काय भूमिका मांडतात, रामराजे गटाच्या राजकारणावर कोणते आरोप करतात आणि आगामी काळातील फलटणच्या विकासाचा रोडमॅप कसा मांडतात, याची प्रचंड उत्सुकता आहे.
उद्याचा आभार मेळावा केवळ विजयाचा जल्लोष न राहता, फलटणच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या भाषणाकडे फलटणकरांसह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











