आज सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस... प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक बदल घडतात, त्याचप्रमाणे आज 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत.
या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. तसेच, काही नियमांमुळे तुमचं महिन्याभराचं आर्थिक बजेट कोलमडण्याचीही शक्यता आहे. या बदलांचा परिणाम शेअर बाजारापासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळीकडे दिसून येणार आहे. त्यामुळे या बदलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जाणून घेऊयात, आजपासून होणाऱ्या बदलांबाबत...
एलपीजीच्या किमती स्वस्त : दिलासा
देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी दरांमध्ये बदल करतात. अशा परिस्थितीत एलपीजीच्या किमतींमध्येही बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडरच्या किमतींत दिलासा दिला आहे. सरकारने 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली आहे.
T+3 नियमाला मान्यता
मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) ने Initial Public Offering म्हणजेच, आयपीओ (IPO) बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती. लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. SEBI ने यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. आपल्या अधिसूचनेत सेबीनं म्हटलं आहे की, 1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणार्या सर्व IPO साठी लिस्टिंगच्या वेळेचे नवीन नियम स्वेच्छेने लागू केले जातील. तसेच, 1 डिसेंबर 2023 पासून, कंपन्यांना नियमांचं पालन अनिवार्यपणे करावं लागेल. SEBI ने 28 जून रोजी झालेल्या बैठकीत T+3 नियमाला मान्यता दिली होती.
क्रेडिट कार्डला नवीन नियम
1 सप्टेंबर 2023 अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड (Axis Bank Magnus Credit Card) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची असणार आहे. सप्टेंबरच्या एक तारखेपासून या क्रेडीट कार्डाच्या अटी आणि शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाईटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. एवढंच नाही तर या क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे 1 सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्कही भरावं लागणार आहे, याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.
आधार अपडेट करण्याची शेवटची संधी
जर तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर तुमच्याकडे ते अपडेट करण्याची शेवटची संधी आहे. UIDAI नं आधार अपडेटची सुविधा मोफत दिली आहे. त्याची मुदत 14 सप्टेंबर रोजी संपत आहे. यापूर्वी ही सुविधा 14 जूनपर्यंत होती. त्यानंतर तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. तुम्हीही अद्याप आधार अपडेट केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार अपडेट करुन घ्या.
सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँक राहणार बंद
सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर, आधीच पूर्ण करुन घ्या. कारण संपूर्ण महिन्याभरात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. RBI ने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार या बँक सुट्ट्या बदलू शकतात. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. एकीकडे कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे सण पुढील महिन्यात 2023 च्या सप्टेंबरमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे 3, 9, 10, 17, 23 आणि 24 सप्टेंबरला रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यामुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही.