संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण दुपारी ४ वाजता पार पडले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग...माऊलींच्या आश्वांनी घेतलेली दौड...दिंडीतील वारकर्यांच्या पायंनी घरलेला ठेका...टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगड्या अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात माऊली, माऊलीचा जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि जोडीला हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणार्या वारकर्यांच्या जोशात वातावरणातील गारवा अंगावर झेलत दंग झालेला वैष्णवांचा मेळा आणि अश्वांनी केलेली दौड अशा पद्धतीने पार पडलेल्या वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाने उपस्थितासह वारकर्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण मंगळवार दिनांक ९ रोजी चांदोबाचा लिंब तरडगाव येथे पार पडले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी तळावर आगमन केल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगावाजताच माऊलीच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली व लगेचच सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. लोणंदकर नागरिक महिला भाविकांनी ओढ्यापर्यत परंपरेप्रमाणे येत माऊलींचा पालखीला निरोप दिला. माऊलीचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला.फलटणच्या कापडगाव येथील सरहद्दीवर फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी निखिल मोरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमतकुमार शहा, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्वागत केले.
पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सार्या विठ्ठलभक्त वारकर्यांना वेध लागले होते ते उभ्या रिंगणाचे.संपुर्ण पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण,रिंगणाच्या उत्सुकतेने वारकर्यांची पाऊले भराभर चांदोबाच्या लिंबाकडे पडत होती सोहळा पुढे पुढे सरकत होता.रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या स्थानिक नागरिंकामधून आनंद व्यक्त केला जात होता.रस्त्याकडील बाजूला असणार्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूड रंगली होती.
घर तुटकेसे छप्पर,देवाला देवघर नाही,मला दादला नको गं बाई या संत एकनाथ महाराजांच्या भारूडात वैष्णव दंग झाला होता भारूडात रंगत येत होती सोहळा पुढे सरकत चांदोबाचा लिंब येथे आला.या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविंकांनी पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान माऊलीचां रथ चांदोबाचा लिंब येथे आला गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यंानी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली.कोणतीही सुचना न देता वारकर्यांच्या गर्दीतुन हजारो लाखो वारकरी दुतर्फा झाले व अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली.दुसरीकडे अश्व धावणार असलेल्या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रंगीबेरंगी रांगोळी घालुन वातावरणात अधिक प्रसन्नता आणली होती. रिंगण लावल्यानतंर रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजार्यांनी दौडत आणला.
सर्व दिंडीकरांचा टाळ मृदंगाच्या आवाजात माऊलींचा होत असलेला गजर सुरू असतानाच दौडत आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता पाहता दोन्ही अश्वांनी माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यापर्यत्र नेल्यानंतर माघारी पळत आला.माऊलींच्या रथा जवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुुखानंी अश्वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्याचा नैवद्य दाखविला त्यानंतर अश्वाने दौड घेतली.पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीच अश्व अशी दौड पुर्ण झाली. अश्व दौडत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच चोपदारांनी रथावर उभे राहुन हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शवले. यानंतर सोहळा माऊलींचा गजर करत पुढे मार्गस्थ झाला.
अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आर्शीर्वाद असलेल्या भाविकांनी अश्व ज्या ठिकाणाहुन गेला आहे,त्याच्या पायाखालीची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.ज्ञानोबा माऊली- तुकाराम व पंढरीनाथाच्या जयघोषात सर्व वारकरी तल्लीन झाले होते.अशा तर्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले.या नंतर सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. ग्रामस्थांनी पालखी रथातून खाली उतरवून माऊलीच्या गजरात खांद्यावर घेतली व मेळा वाजत गाजत तालुक्यातील पहील्या मुक्कामासाठी तरडगावात विसवला.