महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, आदी ठिकणी तब्बल ३८ वर्षे कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ अधीक्षक पदापर्यंत प्रशासकीय सेवा करून १९९९ साली सेवानिवृत्त झालेल्या बुद्धवासी शामराव बाबुराव खरात यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रशासकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रातील कार्य कर्तृत्वाचा घेतलेला आढावा..
शामराव बाबुराव खरात यांचा जन्म क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावात झाला. दहिवडी येथील प्राथमिक शिक्षणानंतर शामराव खरात यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे पूर्ण झाले. १९६१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा प्रारंभ केला होता. पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, आणि मुंबई याठिकाणी शिक्षण मंडळाचे १९६६ मध्ये विस्तारीकरण झाले. दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथे त्यांना वरिष्ठ अधीक्षक पदावर बढती मिळाली. ३८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना अनेक पेच प्रसंग निर्माण झाले होते. त्या सर्व प्रसंगांना त्यांनी धैर्याने व चातुर्याने त्यांनी तोंड दिले होते. आपल्या अथक परिश्रमातून स्वच्छ कारभाराची इमेज निर्माण केली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांच्या विश्वासास पात्र राहुन त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा आगळा वेगळा ठसा निर्माण केला होता. आपल्या पारदर्शी व प्रामाणिक कार्यपद्धतीतून शिक्षण मंडळातील अन्य पदाधिकारी व कर्मचारी यांच्या समोर एक आदर्श निर्माण केला होता. त्यामुळे आदर्शवत व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची या मंडळात ओळख होती.
नोकरी अथवा चाकरी इमाने इतबारे करावी हा मूलमंत्र देणाऱ्या आपल्या आई-वडिलांचा विचार केंद्रबिंदू मानून आपल्यातील उपजत सेवा कौशल्य पणाला लावून ३८ वर्षे प्रशासकीय कामकाज त्यांनी उत्तमपणे पार पाडले. प्रशकीय सेवेबरोबरच फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार त्यांनी समाजव्यवस्थेमध्ये मनापासून केला. आपल्या कुटुंबातील मुलांना शिक्षित करून समाजव्यवस्थेतील अन्य घटकांनाही शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले व प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष करणाऱ्या अन्य घटकांना त्यांनी सहकार्य केले.
शामराव खरात यांना वाचन व लेखनाचा छंद असल्याने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. वाचन संस्कृती वाढावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले होते. दलित ऐक्यावर त्यांनी लिहलेले 'एकीकरण' पुस्तक आजही महत्वपूर्ण ठरत असून त्या पुस्तकाचे अनेकांनी वाचन करावे असा त्यांचा विचार होता. फुले, शाहू, आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण व सामाजिक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच त्यादिशेने सर्वसामान्य घटकांना घेऊन जाण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची माण सारख्या दुष्काळी भागाला आणि सामाजिक चळवळीला ओळख होती.