राज्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यातही दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या 11 आगारातील 350 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमुळे एस.टी.ला दररोज कोट्यवधीचा फटका सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने अत्यावश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. बाधितांच्या वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळे एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या सातारा आगारातून मुंबईला दररोज दोन बसेस व पुण्याला सकाळी दोन सोडल्या जात आहेत. महाबळेश्वर आगारातून पुण्यासाठी सकाळी व सायंकाळी प्रत्येक दोन बसेस तर फलटण आगारातून पुण्याला दोन बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी 25 हून अधिक प्रवासी झाल्यास बसेस सोडण्यात येत आहेत.
याशिवाय अत्यावश्यक सेवेसाठी तालुका ते जिल्हा अशा सकाळी व संध्याकाळच्या फेर्या सुरू आहेत. एसटीच्या सुमारे 150 फेर्या सुरू आहेत. सध्या प्रवासी नसल्याने सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज या 11 आगारातील सुमारे 350 बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एस.टी.च्या तोट्यात आणखी वाढ होणार आहे. लॉकडाऊनचा एसटीला फटका बसत आहे.