मलकापूर, ता. कराड येथे बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार्या परदेशी दोन नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली होती. सदर दोघेही रोमानियाचे नागरिक असून त्यांना सोमवारी 6 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कराड : मलकापूर, ता. कराड येथे बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार्या परदेशी दोन नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली होती. सदर दोघेही रोमानियाचे नागरिक असून त्यांना सोमवारी 6 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलकापूर येथील एका एटीएममधून 13 नोव्हेंबर रोजी 21 हजार 600 रुपये काढण्यात आले होते. त्याची तक्रार कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती घेतली असता दोन परदेशी नागरिकांनी एटीएममधून पैसे काढल्याचे दिसून आले होते. तेंव्हापासून पोलिसांचा परदेशी नागरिकांवर वॉच होता. तसेच पोलिसांनी तशा सुचना एटीएमच्या सुरक्षा रक्षकालाही दिल्या होत्या.
त्यानुसार रविवारी 5 रोजी दोन परदेशी नागरिक मलकापूरमधील त्याच एटीएममध्ये गेल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकाने याबाबतची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. येथे त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 75 एटीएम कार्ड सापडले. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममध्ये ते कार्ड चालत नसले तरी ते सहकारी बँकांच्या एटीएममध्ये चालत होते. त्या कार्डवरती सुमारे 35 लाख रुयये असल्याचे व ती सर्व रक्कम ते परदेशी नागरिक काढू शकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून ती सर्व कार्ड जप्त केली.
संशयितांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करत आहेत.