फलटण दि. ८ :
ऐतिहासिक फलटण संस्थानचे अधिपती, महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज मंगळवार दि. ९ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुधोजी क्लब मैदान, फलटण येथे विधानसभा विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी असून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. शंभूराज देसाई विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. विक्रमसिंह पाटणकर, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मंगळवार दि. ९ मे रोजी सकाळी ९.०० वाजता फलटण तालुक्यातील प्रमुख ७५ मंदिरांमध्ये कृष्णेच्या पाण्याने जलाभिषेक व पूजा कार्यक्रम होईल. त्यासाठी सोमवार दि. ८ मे रोजी श्रीराम मंदिर, फलटण येथून या ७५ गावातील ग्रामस्थ बंधू - भगिनी यांचेकडे कृष्णेचे पाणी सुपूर्द करण्यात आले आहे.
मंगळवार दि. ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मुधोजी क्लब मैदान, फलटण येथे आयोजित मुख्य सत्कार सोहळ्यात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना चांदीच्या अमृत कुंभामध्ये कृष्णेचे पवित्र जल देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. सदर अमृत कुंभ मंगळवार दि. ९ मे रोजी दुपारी ३ वाजता शंकर मार्केट येथून पालखीत ठेवून मिरवणुकीने सभास्थानी नेण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारी ४.०० वाजता मुधोजी क्लब मैदानावर कृष्णेच्या पाण्याने आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ग्रंथ व जल तुलेचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते कृष्णेच्या पाण्यासह चांदीचा अमृतकुंभ, शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
त्यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जायंटस ग्रुप, फलटण यांच्यावतीने ग्रंथतुला व धान्य तुला होणार आहे.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्यास संपूर्ण सातारा जिल्ह्यासह शेजारच्या पुणे, सोलापूर जिल्ह्यातील आणि फलटण तालुक्यातील बहुसंख्य जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. दिपकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.