फलटण प्रतिनिधी -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर भावना व प्रेम असले तरीही भविष्यातील राजकीय दृष्टी व विकासात्मक कामाकरिता आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबरच राहणार असल्याचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर यांनी सांगितले. ते धैर्य टाईमशी भ्रमणध्वनीवरून बोलत होते.
नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांसह राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारला पाठिंबा देत मोठा राजकीय भूकंप घडवला होता. त्या पार्श्वभूमीवर ते आपली भूमिका स्पष्ट करताना बोलत होते.
पुढे बोलताना श्रीमंत शिवरूपराजे म्हणाले, खासदार शरद पवार यांच्या विषयी आपली भावना व प्रेम असले तरीही भविष्यात आपल्या मतदार संघात विकास करायचा असल्यामुळे सत्तेत सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. मागील एक वर्ष सत्तेचा नसल्यामुळे आपल्या मतदार संघातील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर राजकीय भूमिका घेताना मतदार संघाचा विकास साधने हे आपले ध्येय असल्याचे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर - निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
खासदार शरद पवार यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो मात्र काळजावर दगड ठेवून आपण अजितदादा पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगतानाच भविष्यात दोन्ही पवार एकत्र येतील असा आशावाद यावेळी श्रीमंत शिवरूपराजे यांनी व्यक्त केला.