फलटण प्रतिनिधी :
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आता आर-पारची लढाई सुरु केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज फलटण येथे मराठा आंदोलनास पाठींबा देण्यासाठी अक्षयकुमार आत्माराम सस्ते यांनी भारतीय जनता पक्षाच्या फलटण तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.
राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. एकीकडे आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. नांदेड आणि जालना जिल्ह्यातील तरुणांनी याच आरक्षणापायी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता अनेक गावामध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर झळकू लागले आहेत. आता राजीनामा सत्र सुरु झाल्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलन अधिक तीव्र होताना दिसू लागले आहे.