फलटण प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत मात्र भविष्यातील विकासात्मक दृष्टी ठेवून व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निर्णयाला समर्थन देत आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याबरोबर जाणार असल्याचे स्पष्टमत महानंदा डेअरी मुंबईचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक ज्ञानेश्वर तथा डी के पवार यांनी साहस वार्ताशी बोलताना स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयाची फलटण तालुक्यात चर्चा सुरु आहे.
नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांसह राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारला पाठिंबा देत मोठा राजकीय भूकंप घडवला होता. त्या पार्श्वभूमीवर ते आपली भूमिका स्पष्ट करताना बोलत होते.
पुढे बोलताना डी.के. पवार म्हणाले की खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्याचबरोबर देशातील संरक्षणमंत्री, कृषिमंत्री म्हणून उत्तम काम केले आहे.
आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला श्रीमंत रामराजे यांनी पाठींबा दिला आहे त्यामुळे आपणही आमचे मार्गदर्शक नेते रामराजे यांच्या बरोबर राहणे पसंत करीत असून भविष्यातील राजकीय दूरदृष्टी लक्षात घेता अजित पवार यांच्या बरोबर राजकीयदृष्ट्या राहणे पसंद करू असे डी. के. पवार यांनी स्पष्ट केले.
ज्याप्रमाणे खासदार शरद पवार यांनी देश पातळीवर काम करत आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्याचप्रमाणे भविष्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देशात काम करण्याची संधी मिळेल असा आशावाद यावेळी डी.के. पवार यांनी व्यक्त केला.