छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना सोबत घेत स्वराज्य स्थापन केले. हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने फलटण तालुक्यातील बारा बलुतेदार व अठरापगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती फलटण शहरात दिनांक 22 एप्रिल 2023 ला मोठा दिमाखात साजरी करणार असल्याचे फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह या ठिकाणी आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
22 एप्रिल रोजी फलटण शहरात साजरी होणाऱ्या या शिवजयंती उत्सवात पहिल्यांदाच विविध महापुरुषांचे चित्ररथ या शिवजयंतीचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. पारंपरिक वाद्यांसह फलटण शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शिवजयंती आकर्षण रोशनाई व फुलांची सजावट अनेकांचे लक्ष वेधून घेणार आहे. तर हत्ती, घोडे, पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक मैदानी खेळ, यासह फलटण तालुक्यातील हजारो शिवप्रेमी या जयंती सोहळ्यास सहभागी होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.