फलटण | धैर्य टाईम्स |
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवत फलटण येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवत फलटण येथील डॉ.बी आर आंबेडकर आय.आय.टी च्या विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला फलटण पासून 19 किलोमीटर अंतरावर असलेला संतोषगड किल्ल्यावर जाऊन विद्यार्थ्यांनी साफसफाई केली. डॉ.बी आर आंबेडकर आय.आय.टीचे संचालक शेखर कांबळे व त्यांच्या पत्नी. सौ. मनीषा कांबळे यांच्या संकल्पनेतून संतोषगड किल्ल्याची साफसफाई करण्यात आली.
डॉ.बी आर आंबेडकर आय.आय.टी सेंटर पासून सर्व विध्यार्थी चालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून गड किल्ले स्वच्छता मोहीमेस प्रारंभ झाला.
ताथवडा येथे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व इतर ग्रामस्थांनी डॉ.बी आर आंबेडकर आय.आय.टीचे संचालक शेखर कांबळे, त्यांच्या पत्नी. सौ. मनीषा कांबळे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
दोन तास गड चढून गेल्यानंतर गडाची स्वच्छता करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडा भारुड व स्वतःचे मनोगते ही व्यक्त केली सर्व महिलांनी बाळ शिवबाचा पाळणा गायला.अतिशय उत्साहात ही एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.
संतोषगड विषयी थोडेसे...
फलटण तालुक्यात असलेला एकमेव ऐतिहासिक किल्ला म्हणजे ताथवडे गावातील ‘ताथवडा ऊर्फ संतोषगड’. शिवाजी महाराजांनी तो गड 1662 मध्ये बांधल्याचे सांगितले जाते. मात्र किल्ला फलटणचे अधिपती असलेल्या बजाजी नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात 1665 मध्ये होता. तो गड मिर्झाराजे जयसिंह व शिवाजी महाराज यांच्यातील पुरंदरच्या तहानुसार मोगल व मराठे यांच्या संयुक्त फौजांनी 7 डिसेंबर 1665 रोजी जिंकून घेतला. नंतर किल्ला विजापूरकर आणि मोगल यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार आदिलशाहीच्या ताब्यात गेला. किल्ला आणि त्या खालील मुलुख शिवाजी महाराजांनी आग्रा येथून सुटून आल्यावर 1673 मध्ये जिंकून, स्वराज्यात आणून किल्ल्याचे नामकरण ‘संतोषगड’ असे केले. तो मोगलांनी पुढे, 1689 मध्ये परत जिंकून घेतला. मात्र तो 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुन्हा मराठा फौजांनी जिंकून स्वराज्यात आणला. तो किल्ला नहिसदुर्ग सरकारमध्ये उपविभागाचे मुख्य ठाणे असल्याची नोंद आहे (इंग्रज कालखंडात तो परिसर नहिसदुर्ग व रायबाग सरकार या दोन्ही व्यवस्थापनांमध्ये समाविष्ट होता). त्यावेळी त्याचा महसूल एक हजार एकशेवीस रुपये होता. तशी नोंद 1790 च्या महसूल अहवालात आहे. तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात पुढे, 1818 पर्यंत होता. तो ब्रिटिशांनी प्रतिकाराशिवाय जिंकला. ब्रिटिशांविरूद्ध बंड करणारे उमाजी नाईक यांनी संतोषगडाचा आश्रय 1827 मध्ये घेतला होता.